मेंढेगाळी गावचा रहिवासी भांबार्डी परिसरात घडली दुर्दैवी घटना
खानापूर: भांबार्डी (ता. खानापूर) गावाजवळील शेतात आंबे काढताना झाडावरून पडून एक उद्योजक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ७ मे) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव रवळनाथ नारायण गुरव (वय ४५, मूळगाव मेंढेगाळी, ता. खानापूर; सध्या रा. शिवणे, पुणे) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवळनाथ गुरव हे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी कुटुंबासह पुण्याहून गावी आले होते. बुधवारी त्यांनी हलशी-भांबार्डी रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतातील आंबे काढण्यासाठी झाडावर चढले असताना पायाखालची फांदी तुटली आणि ते खाली कोसळले.
झडपडून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ हलशी येथील दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खानापूरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डोक्याला झालेल्या आघातामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.
रवळनाथ गुरव यांचा पुण्यात शिवणे येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे.
या घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात झाली असून, गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
