हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील पाटील यांची बिनविरोध निवड; रणजीत पाटील गटाचा विजय
खानापूर: हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून, या निवडीमुळे रणजीत पाटील गटाचा विजय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, सुनील पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे खानापूर तालुक्यातील सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी मंजुनाथ मनकावी यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता प्रक्रिया सुरू झाली.
यामध्ये रणजीत पाटील गटाचे उमेदवार सुनील पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. छाननीनंतर एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील, पांडुरंग पाटील, मंदा फठाण, स्वाती पाटील, इंदिरा मेदार आणि नाजिया सनदी उपस्थित होते, तर तीन सदस्य अनुपस्थित होते.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील पाटील यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याचा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.