खानापूर को-ऑप. बँक नोकर भरतीत गैरव्यवहार: चौकशीची मागणी
खानापूर: माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी खानापूर को- ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकर भरतीत गैरव्यवहार झाला असून अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे.
खानापूर को-ऑप. बँकेत झालेली शिपाई आणि क्लार्क भरती प्रक्रिया संशयास्पद असून सखोल चौकशी न झाल्यास बँकेसमोर उपोषणास बसण्याचा इशाराही मरगाळे यांनी दिला आहे.
भरतीसाठी दिलेल्या प्रवेश परीक्षेच्या उत्तर पत्रिका मागितल्या आहेत. त्याही दिल्या जात नाहीत. यावरुन भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरू असल्याचा संशय आहे. ही बाब संचालकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. काही संचालकांना विश्वासात न घेता भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नोकर भरतीचा ठराव करण्यासाठी सर्व संचालकांची संमती आवश्यक असताना काही संचालकांचा विरोध डावलून नोकर भरती पूर्ण करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरोप निराधार : चेअरमन अमृत शेलार
बँकेची भरती प्रक्रिया पूर्णपणे सहकार विभागाच्या नियमानुसार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे झाली आहे.100 वर्षांची बँक असल्याने विस्तार वाढवण्यासाठी नव्या शाखांना मंजुरी मिळाली आहे. तेथे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून बँकेची गरज ओळखूनच भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत, असे चेअरमन अमृत शेलार यांनी सांगितले.