भीषण अपघातात खानापूर येथील भारतीय सेनेतील जवान ठार
प्रभूनगर, ता. ३१ जुलै (खानापूर): खानापूर-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील प्रभूनगर गावाजवळ आज दुपारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात खानापूर येथील युवक आणि भारतीय सेनेतील जवान सुरज मोहन द्रौपदकर (वय २९, रा. विद्यानगर, खानापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, केए २२ एचके ८४९४ क्रमांकाची Yamaha FZ कंपनीची दुचाकी घेऊन सुरज प्रभूनगरमार्गे जात असताना त्याचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, सुरज याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मेंदू बाहेर पडला आणि तो जागीच ठार झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर दूर फेकला गेला होता. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
माहिती मिळताच खानापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी खानापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.