गुंजी ग्रामपंचायत अध्यक्षांवर अविश्वास ठराव मंजूर
खानापूर : गुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष गुरव यांच्याविरोधात काल (शुक्रवार) दिनांक 7 रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांपैकी 8 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर एक सदस्य गैरहजर होता.
ही प्रक्रिया प्रांताधिकारी श्रावण नायक आणि विकास अधिकारी प्रीती पत्तार यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच पोलिस अधिकारी निरंजन यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामपंचायतमध्ये सुरू होत्या हालचाली
गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. पंचायत सदस्यांनी यासंदर्भात बेळगाव प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी 7 मार्च रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्याची तारीख निश्चित केली होती.
तालुक्यातील तिसरी ग्रामपंचायत
गुंजी ग्रामपंचायत ही तालुक्यातील तिसरी ग्रामपंचायत ठरली, जिथे अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. यापूर्वी बैलूर आणि हलगा ग्रामपंचायतीमध्येही असे ठराव मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, चापगाव ग्रामपंचायतीतही अविश्वास ठरावाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
