खानापूर तालुक्यात 9 हत्तींचा कळप, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
खानापूर: तालुक्यातील गुंजी भागातील शिंदोळी, आंबेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींचा मोठा कळप घुसल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कळप शेतकऱ्यांच्या कापणीच्या भात पिकांचे प्रचंड नुकसान करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक हत्ती चापगाव, कारलगा जळगे परिसरात फिरत होता व त्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. मात्र आता, शिंदोळी गावातील शेतवडीमध्ये 9 हत्तींचा मोठा कळप घुसून 2 ते 2.5 एकर शेतीचे नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
आज सकाळी शिंदोळी kh येथील शेतकरी गणेश नागो गावडा, विठ्ठल नागो गावडा आणि हनुमंत सदोबा गावडा यांच्या सर्वे नंबर २ मधील शेतात ९ हत्तींच्या कळपाने पिकांचे पूर्णतः नुकसान केले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या वनखात्याकडे हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
तसेच गुंजी पंचायत हद्दीतील आंबेवाडी गावातही हत्तीने भात पिकांचे मोठे नुकसान केले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत.