खानापूर मधील मुख्य मार्गाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ नाव
खानापूर : खानापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मलप्रभा नदी घाटापर्यंत असणाऱ्या शहरांतर्गत महामार्गाला आता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ म्हणून ओळखले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते नव्या नावाचे अनावरण करण्यात आले.
या महामार्गाची पूर्वी बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख होती. मात्र, खानापूर शहराला आता बायपास रस्ता मिळाल्यामुळे, हा जुन्या मार्गाचा तुकडा नगरपंचायतीच्या अधिपत्याखाली आला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने या मार्गाचे नामकरण ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ असे करण्याचा निर्णय घेतला होता.
हा महामार्ग खानापूर बस आगारापासून मलप्रभा नदीपर्यंत जातो. या रस्त्यावर मध्यभागी दुभाजक करण्यात आला आहे. लवकरच या मार्गाचे १४ कोटी रुपयांच्या निधीतून विस्तारीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला खानापूरचे तहसीलदार कोमार, नगराध्यक्ष मीनाक्षी बैलूरकर, उपनगराध्यक्ष जया भूतकी, मुख्याधिकारी संतोष कुरबेट, नगरसेवक आप्पया कोडोळी, नगरसेवक लक्ष्मण मादार, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.