गर्लगुंजी वेंटेड डॅमचं काम त्वरित पूर्ण करा – सहायक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील बिर्जे शेताजवळील सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी सहायक कृषी अधिकारी सतीश माविनकोप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या डॅममुळे गावातील सुमारे ७० ते ८० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, लोकांच्या ये-जा करण्याचा प्रश्नही सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र, आता हे काम कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे कामाला उशीर झाला, अशी माहिती सहायक कृषी अधिकारी माविनकोप यांनी दिली.
या तांत्रिक अडचणी दूर करून वेंटेड डॅमचं काम इमर्जन्सी बेसिसवर पूर्ण करण्यात यावे, जिल्हा परिषदेच्या स्तरावरून तातडीने आदेश घेऊन हे काम मार्गी लावावे, अशी मागणी पाटील यांनी केली. अन्यथा काम लवकर पूर्ण न झाल्यास कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी कृषी अधिकारी चिकमठ, युवक काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार, दिगंबर खांबळे आदी उपस्थित होते.