दारू पिल्याने 33 जणांचा मृत्यू, 60 जणांवर उपचार
तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 60 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कल्लीकुरुचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रसंथ यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. रुग्णांना जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी यासंदर्भात दु : ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘मला ही माहिती कळाल्याने धक्का बसलाय आणि माझं मन दु : खी झालं आहे. विषारी दारु पिल्याने कल्लाकुरुची येथे अनेकांचा मृत्यू झाला. याप्रकरणात दोषी असणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल. याशिवाय याप्रकरणी निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल.’ दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे गुन्हे समाजाला उद्ध्वस्त करत असतात, असं देखील स्टॅलिन म्हणाले.
तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा जीव गमवावा लागल्याने दु : खी झालो आहे. पीडितांच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबासाठी आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पीडितांसाठी मी प्रार्थना करतो, असं ते म्हणाले आहेत. राज्यपालांनी राज्यातील अनेक ठिकाणी अशा घटना घडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विषारी दारू पिऊन होणाऱ्या मृत्यूमुळे वाढ झाली आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची गरज आहे. शिवाय, कल्लाकुरुची येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यपालांनी केली आहे.