गुन्हेगारांना अभय, सामान्यांना त्रास? खानापूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह
खानापूर: खानापूर पोलीस स्थानकात सुरू असलेल्या कथित गैरकारभारामुळे सामान्य, गरीब व कष्टकरी जनतेवर अन्याय होत असल्याचा आरोप करत खानापूर ब्लॉक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस स्थानकातील कारभाराविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यास गेलेल्या नागरिकांनाच दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी काँग्रेसकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक वेळा तक्रारदारांना ताटकळत ठेवून, त्यांच्या विरोधातच कारवाई होईल, अशी भीती दाखवून तक्रार नोंदवून न घेता परत पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारांशी संगनमत करून तक्रारदारांवर अन्याय केला जात असल्याचेही सांगण्यात आले.
ब्लॉक काँग्रेसकडे अनेक तक्रारी
खानापूर ब्लॉक काँग्रेसकडे पोलिसांच्या कार्यपद्धतीविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या असून, या सर्व बाबींची दखल घेऊन पोलीस अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार केली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत पोलीस स्थानकाच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
पोलिसांकडून न्याय मिळण्याऐवजी अन्याय सहन करावा लागत असल्याची भावना तालुक्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. जमीन घोटाळे, अवैध धंदे, गांजा व इतर अमली पदार्थांची खुलेआम चाललेली उलाढाल, अनधिकृत क्लब, क्रिकेट बॅटिंग, मटका व ऑनलाइन जुगार याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांचा वचक कमी, गुन्हेगारांना अभय
खानापूर शहरासह ग्रामीण भागात पोलिसांचा वचक उरलेला नसून, त्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. पोलीस स्थानक आर्थिक साठेलोट्याचे केंद्र बनल्याचा गंभीर आरोपही ब्लॉक काँग्रेसने केला आहे.
सामान्य जनता, शेतकरी व कष्टकऱ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस खपवून घेणार नसून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धारही काँग्रेसने व्यक्त केला आहे.
