खानापूर- यल्लापूर राज्य मार्गावरील कसबा नंदगड येथील व्हन्नव्वा देवी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना, सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी घडली आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गिरीश बसवराज तळवार (वय 14) राहणार गर्बेनहट्टी (तालुका खानापूर) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. गिरीश हा आपल्या काही मित्रांबरोबर सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हन्नव्वा देवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. पावसामुळे तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचे समजते. गिरीश पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी तेथून जाणाऱ्या लोकांना दिली. या घटनेची माहिती गिरीशच्या कुटुंबीयांसह परिसरात पसरली. त्यामुळे नंदगड परिसरातील अनेक लोक तलावाच्या बांधावर जमले होते. त्यानंतर गिरीशचा मृतदेहाचा तलावात शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 5.30 वाजता गिरीशचा मृतदेह सापडला..
गिरीश हा नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. ते मूळचे होसगट्टी ता. बैलहोंगल येथील असून, गेल्या काही वर्षांपासून गर्बेनहट्टी येथे वास्तव्यास आहेत. मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला