भाजपचे आंदोलन, काँग्रेसने माफी मागावी
बेळगाव: केंद्रात काँग्रेसने देशावर लादलेली आणीबाणी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी भाजपने काँग्रेस कार्यालयाला घेराव घालून केली. सोमवारी (२४ जून) शहर व जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला. महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. त्यांनी काँग्रेस पक्षाचे निषेधाचे फलक हातात घेतले होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.
या आंदोलना वेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष जी आमदार अॅड. अनिल बेनके म्हणाले, काँग्रेस आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून संविधानाची हत्या केली होती. हे काँग्रेस पक्षाला आठवत नाही. आमदार अभय पाटील यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आम, संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरुपेंद्रगौडा पाटील, राजेंद्र हरकुणी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वीच पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेऊन मार्केट पोलिस स्थानकात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले.