मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात खानापूरमध्ये भाजपचे तीव्र आंदोलन
खानापूर: कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये फक्त मुस्लिम समाजासाठी 4% आरक्षण जाहीर केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या खानापूर शाखेतर्फे आज शिवस्मारक चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या निर्णयामुळे इतर अल्पसंख्याक समाजांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेचे दहन केले. तसेच सरकारच्या नावाचे फलक पायदळी तुडवत आणि ते पेटवून देत आपला रोष व्यक्त केला.
या आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष बसवराज सानिकप्प, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, तालुका प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ, तसेच गुंडू तोपिनकट्टी, सुंदर कुलकर्णी, सुरेश देसाई, चेतन मनेरिकर, पंडित ओगले आदी भाजप नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपने काँग्रेस सरकारवर धर्माच्या आधारे आरक्षण देत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून, हा निर्णय मागे न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.