खानापूर
दिवसा ढवळ्या पट्टेगाळी येथे घरात घुसले अस्वल; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
पट्टेगाळी (ता. खानापूर) : पट्टेगाळी गावात रविवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा एका अस्वलाने थेट गावातील घरात प्रवेश केला. ही घटना गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली.

सुदैवाने घरात कोणताही सदस्य त्या क्षणी उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी टळली. काही वेळ घरात धुमाकूळ घातल्यानंतर अस्वल जंगलाच्या दिशेने परत गेले. घटनेनंतर गावकऱ्यांनी वनविभागाला तत्काळ माहिती दिली. विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे वाढते दर्शन थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी.