दुचाकी-कार अपघातात 75 वर्षीय वृद्ध ठार
रामनगर प्रतिनिधी
जगलबेट–कॅसलरॉक मार्गावर असू गावाजवळ रविवारी दुचाकी आणि कारच्या भीषण धडकेत ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नीही जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बालकृष्ण बिसो गावडा (वय ७५, रा. कामरा) हे आपल्या पत्नीसमवेत दुचाकीवरून बोरेगाळी क्रॉसमार्गे जात होते. दरम्यान, गोव्याहून दांडेळीमार्गे फणसोलीकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत गावडा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यांची पत्नीही या अपघातात जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रामनगर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.