गणेश विसर्जनावेळी युवकाचा दुर्दैवी मृत्यू, कोडचवाड येथे मृतदेह दिसल्याची चर्चा
खानापूर : अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना खानापूर तालुक्यातील यडोगा येथे मलप्रभा नदीपात्रात शनिवारी दुपारी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
शुभम यल्लाप्पा कुपेकर (वय 21, रा. यडोगा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम आपल्या कुटुंबासह घरगुती गणेश विसर्जनासाठी नदीकाठी गेला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विसर्जनाच्या वेळी तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. काही अंतरापर्यंत तो पोहत असल्याचे सांगण्यात आले, मात्र पुढे तो बेपत्ता झाला.
याबाबतची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाणे, अग्निशामक दल व रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. संध्याकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र नदीतील प्रचंड प्रवाहामुळे सायंकाळी सहानंतर शोधकार्य थांबवावे लागले.
दरम्यान, रात्री आठच्या सुमारास कोडचवाड येथे नदीपात्रात एका मृतदेहाचे दर्शन झाल्याची चर्चा झाली. परंतु रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून रविवारी सकाळपासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे यडोगा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.