फक्त 15 लाख घेण्यास आमगावकरांचा ठाम नकार — पर्यायी जमीन व सुविधा द्या | ಖಾನಾಪುರ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಮಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಬೆಂಬಲಕ್ಕೆ — ಸ್ಥಳಾಂತರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಧೃಡ ನಿಲುವು
खानापूर ब्लॉक काँग्रेस आमगावकरांच्या पाठीशी; स्थलांतर प्रकरणात ठाम भूमिका
खानापूर: माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार खानापूर ब्लॉक काँग्रेसचे शिष्टमंडळ आज आमगाव येथे ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी भेट देऊन मोकळ्या वातावरणात संवाद साधला.
सध्या जंगल परिसरातील गावांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर असताना, आमगावच्या स्थलांतर प्रक्रियेत घाईघाईने निर्णय घेतल्याची आणि काही प्रमाणात तो पुढे ढकलण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमगावकरांची नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने ग्रामस्थांशी मंदीरात बसून खुली चर्चा केली.
ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितले की, जोपर्यंत पर्यायी जागा, त्या जागेवरील मूलभूत सुविधा (शाळा, रस्ते, वीज आदी) आणि प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्थलांतरास तयार नाही.
शिष्टमंडळाने आश्वासन दिले की डॉ. अंजलीताई निंबाळकर खानापूरला आल्यानंतर आमगावकर त्यांना प्रत्यक्ष भेटतील आणि त्यानंतर त्या संबंधित मंत्र्यांशी बोलून सकारात्मक तोडगा काढतील. आवश्यकता भासल्यास महसूलमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल, कारण पर्यायी जमिनीचा प्रश्न महसूल खात्याशी संबंधित आहे.
बैठकीनंतर शिष्टमंडळ बाहेर पडत असताना आरएफओ नदाफ व त्यांची टीम आमगावला पोहोचली. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आमगावकरांनी पुनः एकदा स्पष्ट केले की — “फक्त १५ लाख रुपयांत गाव सोडणे आम्हाला मान्य नाही. जमीन, सुविधा आणि योग्य भरपाई मिळाल्यासच स्थलांतर स्वीकारले जाईल.”
आरएफओ नदाफ यांनी ग्रामस्थांना सांगितले की, त्यांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात दिल्यास त्या पुढे संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविल्या जातील.
या चर्चेत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, ईश्वर बोबाटे, दीपक कवठणकर, सुरेश भाऊ, पत्रकार वासुदेव चौगुले, आरएफओ नदाफ, फॉरेस्टर कदम मॅडम तसेच आमगाव ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
खानापूर ब्लॉक काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले की — “आमगावकरांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
