खानापूर स्थानकावर व्ही.सोमन्ना यांच्या हस्ते योजनांचा शुभारंभ, वारकऱ्यांचे पंढरपूर गाडीसाठी निवेदन
खानापूर (प्रतिनिधी): आज सोमवार (दि. 15) पासून हुबळी-दादर एक्सप्रेसचा थांबा खानापूर रेल्वे स्थानकावर अधिकृतपणे सुरू झाला. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, खासदार विश्वेश्वर-हेगडे कागेरी, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

दरम्यान, सोमन्ना यांनी बेळगाव अनगोळ गेट (चौथे गेट) आणि खानापूर स्टेशन यार्ड येथे दोन अंडर ब्रिज बांधकामाची पायाभरणीही केली. तसेच खानापूर स्थानकातील प्रवासी सुविधांची पाहणी करून, या विकासकामांमुळे परिसरातील जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनगोळ चौथे गेट येथे २६.०५ कोटी रुपये खर्चून नवा पूल उभारण्यात येणार आहे, तर खानापूर स्टेशन यार्डात ११ कोटी रुपये खर्चून रस्ता अंडर ब्रिज (RUB) आणि २.५ कोटी रुपये खर्चून वेटिंग रूम, प्लॅटफॉर्म शेल्टर व प्रवासी शौचालय उभारण्यात येणार आहे.
पंढरपूर गाडीसाठी वारकऱ्यांचे निवेदन

दरम्यान आज खानापूर तालुक्यातील नागरिक तसेच तालुका वारकरी संप्रदाय मंडळाने हुबळी–पंढरपूर–हुबळी या मार्गावर नवी प्रवासी गाडी सुरू करण्याची मागणी करत मंत्र्यांना खासदारांना व आमदाराना गाडीला खानापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी करत निवेदन दिले.
यावेळी खानापूर तालुक्यातील जनता भाजप नेते,कार्यकर्ते वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.