कन्नडसोबत मराठीलाही स्थान मिळायला हवे: अनिल देसाई, आमदारांना निवेदन
खानापूर : मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करत विश्व भारती कला क्रीडा संघाच्या वतीने कन्नड सक्तीच्या विरोधात निवेदन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना सादर करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी सांगितले की, सरकारकडून सर्व फलकांवर कन्नड भाषेचा वापर बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश जरी आलेला असला तरी सीमाभागात या आदेशाचा विपर्यास होत असून मराठी फलक हटवले जात आहेत. यामुळे संविधानाने दिलेले भाषिक अधिकार डावलले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “आमची संघटना सर्व मातृभाषिक शाळा वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. एखाद्या भाषेचा अपमान होणे निषेहर्य असून, सीमाभागात मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे सरकारी फलकांवर कन्नडसोबत मराठीलाही स्थान मिळायला हवे.”
या निवेदनावर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “मातृभाषेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तुमच्यासारख्या इतर मराठी संघटनांनी पक्षांनीही जर आक्रमक भूमिका घेतली तर मराठीचा अपमान कोणी करणारच नाही. कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ते सर्व प्रयत्न आम्ही करू.”
या वेळी संघटनेचे दामोदर कणबरकर, विनोद गुरव, पांडुरंग वरकडकर, सचिन देसाई, कृष्णा खांडेकर, जोतिबा पाटील, मनोहर गावडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.