चार गुन्हे, पाच आरोपी, 14.90 लाखांची चोरी उघडकीस
खानापूर: खानापूर पोलिसांनी चोरीच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करत तब्बल ₹14.90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण पाच संशयित आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रॉयल एनफिल्ड चोरी प्रकरण
2 जुलै 2025 रोजी गर्लगुंजी येथील महेश विठ्ठल कुंभार यांनी खानापूरच्या गणेश कॉलनी, विद्यानगर येथे त्यांच्या घराच्या अंगणात पार्क केलेली रॉयल एनफिल्ड मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी समीर सुरज पाटील (रा. जोयडा) याला अटक केली. त्याच्याकडून ₹2.90 लाख किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
कॅनन कॅमेरा चोरी
दुसऱ्या प्रकरणात कॅनन कंपनीचा एक कॅमेरा आणि लेन्स चोरीला गेले होते. पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपींकडून ₹3.60 लाख किमतीच्या वस्तू जप्त केल्या असून, आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
JCB पार्ट्स व टाटा एस वाहन प्रकरण
तिसऱ्या प्रकरणात एका JCB मशीनचे पार्ट्स व चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा एस गुड्स वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ₹4.80 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कार चोरी प्रकरण
4 मार्च 2025 रोजी श्रीमती सुनिता विष्णू लोहार (रा. वडगाव, बेळगाव) यांनी खानापूर तालुक्यातील गंगवाळी गावाजवळ पार्क केलेली कार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी कार शोधून काढत ₹4.50 लाख किमतीची कार जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपी
या प्रकरणांतून खालील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे:
- समीर सुरज पाटील (जोयडा)
- शोएब रफिक मारिहाळ (आंबेडकर गल्ली, पारीस्वाड)
- शुबानी राजेशाब तोलगी (बडस क्रॉस, पारीस्वाड)
- अतिफ सल्लाउद्दीन सनदी (कराची गल्ली, पारीस्वाड)
- अजीज बाशासाब तल्लूर (आंबेडकर गल्ली, पारीस्वाड)
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही संपूर्ण कारवाई डीएसपी विरय्या मठपती (बैलहोगल), पोलीस निरीक्षक एल.एच. गवंडी (खानापूर), पोलीस उपनिरीक्षक मलन्नगौडा बिरादार आणि अतिरिक्त पीएसआय ए.ओ. निरंजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत बी.जी. यालिगार, जे.आय. कादरोली, बी.एस. नायक, एस.व्ही. कामकेरी, तांत्रिक विभागाचे विनोद तक्कन्नावर, आणि श्री. सचिना पाटील यांनी मोलाचा सहभाग घेतला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पथकाचे कौतुक
बेळगाव जिल्हा अधीक्षक श्री. भीमाशंकर गुळेद (IPS), अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री एन.एस. (IPS) आणि आर.बी. बसरगी (KSPS) यांनी पथकाच्या शोध कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.