नंदगड: बेळगांव जिल्ह्यातल्या बैलहोंगल उपविभागातील नंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने “घराघरात पोलीस – 2025” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचारी गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.
नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 101 गावांचा समावेश असून, अतिरिक्त पीएसआय सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना व विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती दिली जात आहे. स्वतः पोलीस बनून संशयास्पद व्यक्ती किंवा चुकीच्या हालचाली दिसल्या तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून चोरी, फसवणूक आणि इतर गुन्हे रोखता येतील, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या जनजागृती मोहिमेत पोलीस विजय पाटील, हवालदार शिवानंद तुरमरी, एन. बी. बेलवडी, चंदरगी आणि इतर पोलीस कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. नंदगड, बीडी, हलसी अशा अनेक गावांमध्ये हे पोलीस कर्मचारी नागरिकांशी संवाद साधत आहेत.
पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेली ही मोहीम स्थानिक लोकांमध्ये विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.