दूधसागरला जाणे पडले महागात! 21 पर्यटकांवर गुन्हा दाखल
रामनगर: जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा सध्या प्रचंड जलप्रवाहासह रौद्र रूप धारण करून वाहत आहे. सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या व्हिडीओंमुळे पर्यटक या धबधब्याचे सौंदर्य पाहून भारावून जात आहेत. यामुळे अधिकाधिक पर्यटक प्रत्यक्षात हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, काही पर्यटक कर्नाटकच्या बाजूने रेल्वे रुळांवरून चालत धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, धबधब्याच्या परिसरात जाण्यास रेल्वे विभागाकडून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कठोर बंदोबस्त तैनात केला आहे.
तरीसुद्धा काही पर्यटक बंदी झुगारून परिसरात दाखल होत असल्याने, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. अलीकडेच विविध भागांतील आलेल्या 21 पर्यटकांवर रेल्वे कायदा 1989 अंतर्गत कलम 141 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याशिवाय, कॅसलरॉक स्टेशन ते कोलम स्टेशनदरम्यान येणाऱ्या करणजोळ, दूधसागर आणि सोलोळी स्टेशनच्या परिसरात कोणीही प्रवासी उतरल्यास, त्यांच्या विरोधात देखील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात नुकतीच सर्व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक रामनगर विश्रांतीगृहात पार पडली. सद्यस्थितीत पर्यटकांनी दूधसागर धबधब्याचे सौंदर्य फक्त रेल्वे मधूनच अनुभवावे असे सांगितले आहे.