महामार्ग की मृत्यूमार्ग? रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा
वाहनधारकांना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाची शिक्षा
खानापूर: खानापूर-रामनगर महामार्गावरील गुंजी ते कामतगा क्रॉस दरम्यान अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर पुलावरच्या रस्त्याचे काम सदोष झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांत तीन ट्रक आणि एका कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
रस्त्याची धोकादायक स्थिती
होनकल क्रॉस ते रामनगर मार्गावरील नाल्यांवर नव्याने पूल उभारण्यात आले आहेत. मात्र, पूल आणि मुख्य रस्ता यामध्ये उंचीचा समतोल राखण्यात आला नाही. यामुळे त्या भागात गतिरोधकासारखे उंचवटे तयार झाले आहेत.
त्यातच रस्ता वळणदार असल्याने चालकांना उंचसखल भागांचा अंदाज लागत नाही. परिणामी, अनेक वाहन चालकांचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या खाली उलटत आहेत.
सुरक्षा यंत्रणांचा अभाव
पुलांवर बाजूपट्टीचे काम अपूर्ण असून लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेतच आहेत. तसेच, सलग तीन ते चार ठिकाणी उंचवटे निर्माण झाले असल्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारणे कठीण जाते. रस्त्यालगत २० ते २५ फूट खोल खड्डे असून, त्यात वाहन पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहनचालकांचा संताप आणि तक्रारीची तयारी
शुक्रवारी एका ट्रकचा अपघात झाल्यानंतर वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातात ट्रकचे दोन्ही टायर निखळून गेले आणि ट्रक रस्त्याकडेला कलंडला. अपघातग्रस्त ट्रकचे मालक नामदेव चव्हाण यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे.
रामनगर – अनमोड रस्त्यावर मोठमोठे खड्डे
गेली 7 वर्षे हा रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने अनेक अपघात घडत आहेत. स्थानिक वाहनचालक आणि ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण तसेच कंत्राटदार व अभियंत्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीस सुरुवात करून लोकांच्या जिवाशी खेळ केल्याचा आरोप केला जात आहे. वाहनचालकांनी कंत्राटदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करून सुरक्षितता व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी केली आहे.