धक्कादायक दृश्य! बस स्थानकात बिबट्या, अस्वलाने घेतला आसरा
प्रतिनिधी: जोयडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जंगलातील वन्यप्राणी आता थेट लोकवस्ती आणि सार्वजनिक ठिकाणी दिसू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गणेशगुडी गावाजवळील बसस्थानक हे सध्या वन्यप्राण्यांचं थेट आश्रयस्थान ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं होतं. आता त्याच ठिकाणी अस्वल बसून असल्याचं दृश्य काही स्थानिकांनी पाहिलं. यामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गणेशगुडी–दांडेली रस्त्यावरील या बसस्थानकात वारंवार वन्यजीव दिसत असून, याआधी दोन पट्टेरी वाघ आणि ब्लॅक पँथरचंही दर्शन झालं होतं. याच भागातील असो पंचायत क्षेत्रात एका घरात बिबट्या शिरल्याची घटना अजूनही ताजी असतानाच, बसस्थानकात अस्वल दाखल झाल्याने चिंता वाढली आहे.

गवे, अस्वल, बिबट्या, वाघ यांसारख्या धोकादायक प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने, रस्त्यावरून एकटे फिरणं, तेही दिवसाच्या उजेडातही, धोकादायक ठरत आहे. विशेषतः सार्वजनिक वाहतूक केंद्रांवर प्राण्यांचा वावर हा गंभीर बाब ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रवासी वर्गात तीव्र भीती निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.