खानापूर
देवाची हट्टी मार्गावरील झाडे ठरतायत जिवघेणी! वाहतूक ठप्प, वन विभागाच्या दुर्लक्षावर संताप
तोराळी, ता. खानापूर (जि. बेळगाव) : तोराळी ते देवाची हट्टी या मुख्य मार्गावर रस्त्यालगत असलेली जुनी व कोसळण्याच्या स्थितीत असलेली अकेशी जातीची झाडे प्रवाशांसाठी जिवघेणी ठरत आहेत. मागील काही दिवसांत वारंवार झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. मात्र अचानक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहनधारक अडकल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ही स्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
ग्रामस्थ महादेव चव्हाण, बाळासाहेब कांबळे, शिवाजी पाटील व अरुणा देसाई यांनी सांगितले की, “या रस्त्यावर नेहमीच धोकादायक झाडे झुकलेली दिसतात. याआधीही काही अपघात घडले असून वन खात्याला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत, पण यावर अजूनही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.”
वन विभागाने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.