वासकरवाडी येथे सद्गुरु वै. तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रम
खानापूर: श्रीमंत ब्रह्मचैतन्य सद्गुरु वै. तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांचा 27 वा पुण्यस्मरण सोहळा खानापूर तालुका वासरकरी समाजसेवा शिक्षण संस्था, होनकल व गुरुस्वामी सेवेकरी ह. भ. प. गंगाराम मल्हारी हेब्बाळकर, वासकरवाडी यांच्या वतीने बुधवार, 5 मार्च २०२५ रोजी वासकरवाडी येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.

तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत आणि समाजप्रबोधनकार होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी समर्पित केले होते. त्यांचे विचार आणि शिकवण आजही वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या 5 रोजी सकाळी 7 वाजता पोती स्थापना पादुका पूजन व इतर कार्यक्रम होतील. त्यानंतर 10 ते 12 वाजेपर्यंत भजन व पुष्पवृष्टी होईल. 12 ते 3 दरम्यान महाप्रसाद होणार आहे.
संध्याकाळी 6 वाजता प्रवचन कीर्तन होणार आहे. या सोहळ्यात वारकरी संप्रदायाचे अनेक संत, भक्त आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेचे अनुयायी होते. त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या उपस्थितीने या भक्तिमय सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
