
सौंदत्ती यल्लम्मा येथे येत्या 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भरत पौर्णिमेच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बसरीकट्टी येथून रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे.
भैरव कृष्णा चौगुले (वय 30) हे दुचाकीवरून सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी जात असताना मुनवळ्ळीजवळ स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भैरव गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भैरव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी गर्भवती आहे.
हा अपघात गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता घडला. या अपघातात आणखी एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

