आमगावचे स्थलांतर? जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
खानापूर: आमगावची जनता बेघर झालेला नटसम्राट आपल्या पत्नीसह जीवन जगण्यासाठी घराच्या निवाऱ्यासाठी कुणी घर देता का घर अशी याचना करताना करताना दिसत आहे. आमगावातील नागरिक जीवन माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी सरकार कडून अपेक्षेत आहेत. शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे अपेक्षा ठेवून असलेल्या आमगाववासियांना जगणे असह्य झाले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी एका महिलेला उपचारासाठी धो धो पावसात चार किलोमीटर तिरडी वरून नदी पर्यंत नेण्याची वेळ दुर्दैवी वेळ आली. या घटनेची जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आमगावातील समस्यांसंदर्भात शुक्रवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमगाववासियांच्या स्थलांतराबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
देशात डिजिटल इंडियाचे नगारे वाजविले जात असताना बेळगाव जिल्ह्यातील, खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेले आमगाव विकासकामां पासून कोसो दूर राहिले आहे. साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्यासाठी तब्बल साडेसहा किलोमीटर खाचखळग्यांनी भरलेला रस्त्यातून गावकऱ्यांना पायपीट करावी लागते.
कर्नाटक राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आमगावात झाल्याची नोंद झाली आहे. मात्र याच गावाला उन्हाळ्याच्या दिवसात दोन महिने पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा कोसळतात, त्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव आणि त्यातच पावसाळ्यात महिनाभर या भागाला वीज पुरवठा होत नाही. 1983 साली आमगाववासियांना स्थलांतर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.आमगाववासियांना आमटे गावां नजीक जागा देण्यात येणार आहे.आमगाववासीयांनी आतापर्यंत स्थलांतराकडे दुर्लक्ष केले आहे.
गावात प्राथमिक शाळा असली तरीही माध्यमिक शाळेसाठी गावातील विद्यार्थ्यांना खानापुर अथवा लोंढा येथे जाऊन वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे लागते. या गावाच्या दरम्यान असलेल्या बैल नदीवर बंधारा कम ब्रिज बांधण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. रस्ताच नसल्यामुळे या गावाकडे कोणतेच वाहन येत नाही. त्यामुळे या गावाला रुग्णवाहिका कधी पोहोचलीच नाही. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. गावकऱ्यांना सातेरी माउली वर विश्वास ठेवून आपल्या आरोग्याची काळजी करावी लागते.
एका बाजूला देशात स्मार्ट सिटीच्या योजना सुरू असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील जनतेला वीज,रस्ता, पिण्याच्या पाण्यासाठीही वंचित राहावे लागत आहे,हीच खरी वस्तुस्थिती आहे, मात्र याचे गांभीर्य शासन, आणि प्रशासनाला दिसत नाही. मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही अशा दुर्गम भागातील जनतेच्या समस्यांची दखल घेण्याची गरज वाटत नाही.
या गावाला खासदारांनी कधी पाय लावला नाही. या भागातील आमदारांनी केवळ आश्वासन देत गावकऱ्यांची आत्तापर्यंत बोळवण केली आहे.त्यामुळे आम्ही जगायचे कसे हाच प्रश्न आमगाववासियांना भेडसावत आहे.आमगाववासीयांच्या व्यथा वेदनांची जाणीव ठेवून शासन,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्या गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
khanapur amgav
khanapur taluka news today
khanapur news today
न्युज सोर्स: श्रीकांत काकतीकर