१८ वर्षांनंतर नेरसा-काटगाळी येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरणार; २८ एप्रिल २०२७ रोजी भव्य धार्मिक सोहळा!
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा-काटगाळी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २८ एप्रिल २०२७ रोजी देवीची भव्य यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नेरसा-काटगाळीसह परिसरातील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेच्या नियोजनासंदर्भात नेरसा येथे १६ गावांतील नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय बबनराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेची तारीख तसेच यात्रेपूर्वी पार पडणाऱ्या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत सर्वानुमते बुधवार, २८ एप्रिल २०२७ रोजी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच यात्रेपूर्वी देवीचे रेडे सोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम १० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
नेरसा-काटगाळी येथे यापूर्वी २००८ मध्ये देवीची यात्रा पार पडली होती. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी पुन्हा यात्रेचे आयोजन होत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. या यात्रेला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व असल्याने परिसरातील गावांमधील नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरणार आहे.
या बैठकीला यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय बबनराव देसाई यांच्यासह अनंत लक्ष्मणराव देसाई, नितीन लक्ष्मणराव देसाई, हैबतराव देसाई, सखाराम देसाई, गोविंद देसाई, सटवाप्पा देसाई, सुरेश देसाई आणि अशोक देसाई उपस्थित होते. तसेच परिसरातील विविध गावांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेची तारीख निश्चित झाल्याने आता प्रत्यक्ष नियोजन आणि तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांनंतर भरणाऱ्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
