खानापूर हादरले : 18 वर्षीय वेंकाप्पाचा मारहाणीमुळे मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील माणिकवाडी गावातील वेंकाप्पा मल्लारी मयेकर (वय 18 वर्षे) या युवकाचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुमेवाडी येथील नागराज गुंडू बेडरे व विजय गुंडू बेडरे या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा खानापूर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
तक्रारदार मल्लारी विठ्ठल मयेकर (रा. माणिकवाडी, ता. खानापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिवंगत वेंकाप्पा मयेकर हा आरोपींच्या रुमेवाडी येथील ‘विराज लॉज’मध्ये मजूर म्हणून काम करत होता. या काळात लॉजमध्ये सोन्याची चोरी झाल्याचा संशय घेऊन आरोपींनी वेंकाप्पाला जबर मारहाण केली होती.
घटनेचा तपशील :
दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 7.00 वाजता आरोपींनी वेंकाप्पाला त्यांच्या बुलेट मोटारसायकलवर बसवून माणिकवाडी येथील घरी आणले. तेथे त्याला चेहरा, छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, “हा प्रकार कुणाला सांगितलास तर संपवून टाकू” अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा लॉजमध्ये नेऊन त्याला मारहाण करण्यात आली.
या मारहाणीमुळे वेंकाप्पाच्या पोटाला व छातीत गंभीर दुखापती झाल्या. कुटुंबीयांनी त्याला सुरुवातीला बेळगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्येत सुधारली नाही म्हणून 26 ऑगस्ट रोजी अपूर्वा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी बीआयएमएस (जिल्हा रुग्णालय, बेळगाव) येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच 4 सप्टेंबर रोजी पहाटे 1.20 वाजता वेंकाप्पाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खानापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास पी.आय. एल. एच. गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेतील कलम 127(2), 115(2), 140(1), 103(1), 352, 351(2) तसेच सहकलम 3(5) बीएनएस अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.