खानापूर : रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात एनएसएस उपक्रमाचा शुभारंभ
खानापूर : येथील लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. पंढरी परब होते. उद्घाटन जिल्हा एनएसएस संपर्क अधिकारी प्रा. एम. ए. मुल्ला यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डी. एन. मिसाळे उपस्थित होते. प्राचार्या प्रा. शरयू कदम व प्रा. सोनी गुंजीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्या प्रा. शरयू कदम यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी प्रा. मुल्ला म्हणाले, “एनएसएसमुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित होतात, व्यक्तिमत्व घडते आणि समाजाबद्दलची बांधिलकी वृद्धिंगत होते.”
डॉ. डी. एन. मिसाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आयुष्याला आकार द्यायचा असेल तर विद्यार्थीदशेतूनच सामाजिक कार्यात सक्रिय व्हा. एनएसएस ही त्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.”
अध्यक्षीय भाषणात पंढरी परब म्हणाले, “विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांच्या अंगी सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गुण रुजले, तर त्यांच्याकडून समाजोन्नतीचे कार्य होऊ शकते.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संदिप पाटील, प्रा. गुंडू कोडला, इमिलिया फर्नांडिस, डी. व्ही. पाटील, देवेंद्र घाडी आणि शिवाजी बेतगावडा यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर गावडा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रेणुका पाटील यांनी मानले.

