कारलगा गावात जंगली प्राण्याचा हल्ला; रेड्याचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कारलगा: गावातील शेतवाडीत, 9 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी एका अज्ञात जंगली जनावराने रेड्याला ठार मारले. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतकरी आशोक मारुती घाडी आणि त्यांचे कुटुंबीय भात कापणीसाठी शेतात गेले होते, त्यावेळी त्यांनी आपल्या जनावरांना माळरानात चारण्यासाठी सोडले होते. जेवणाच्या वेळेस, माळरानात जाऊन त्यांना आपला रेडा मरणासन्न अवस्थेत रक्ताने सांडलेला आणि जखमांनी भरलेला दिसला.
रेड्याची मान मोडलेली होती आणि त्याच्या शरीरावर खूप जखमा होत्या, तसेच त्याच्याभोवती रक्ताचा सडा पडलेला होता. या पाहणीवरून शेतकऱ्यांना शंका आली की, जंगलातील वाघ किंवा बिबट्याने हल्ला केला असावा. यापूर्वी, कारलगा गावाच्या आसपास खैरवाड आणि हाडलगा गावांच्या सीमेवर बिबट्याने बकऱ्याचा बळी घेतल्याची घटना घडली होती, त्यामुळे या हल्ल्याचे कारण बिबट्या किंवा वाघ असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनाची माहिती वनविभागाला देण्यात आली, आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आता आपल्या जनावरांची सुरक्षितता घेण्यासाठी अधिक सावध राहावे लागणार आहे, कारण जंगली प्राण्यांचा वावर या भागात अधिक होऊ शकतो.