रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर झाड कोसळल्याने तरुण जागीच ठार
बेळगाव : कर्ले- बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले दोघे जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी दहाच्या सुमारास घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय २०, रा. कुर्ले) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमनाथ व त्याचे दोन मित्र कामानिमित्त कर्ले येथून बेळगुंदी येथे जात होते.
बेळगुंदी येथील स्मशानभूमीजवळ दोन्ही बाजूला अनेक आकाशीची झाडे आहेत. यातील एक झाड दुचाकीवरून जाणाऱ्या सोमनाथवर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले स्वप्नील सुनील देसाई (वय २१) आणि विठ्ठल कृष्णा तलवार (वय २०) गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.