मुख्य दरवाजाची कडी तोडून मंदिरात चोरी
देसुर: येथील विठ्ठल-रुखुमाई मंदिरात चोरी झाली असून मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत विठ्ठल व रखुमाई मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विठ्ठल-रखुमाई मंदिरानजीक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मंडळाचा हिशोब करत होते. कार्यकर्ते घरी गेल्यानंतर मध्यरात्री तीन ते पहाटे पाचच्या दरम्यान चोरी झाल्याचा संशय आहे.
चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून विठ्ठल रखुमाईचे चांदीचे किरीट, विठ्ठल मूर्तीच्या कानातील मासोळीच्या आकाराच्या चांदीची कर्णफुले, रखुमाईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र पळविले आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सातेरी मालजी हे मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती गावातील पंचमंडळींना दिली. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.