48 तासानंतर शुभमचा मृतदेह सापडला
खानापूर: गणेश विसर्जनासाठी मलप्रभा नदीत उतरलेल्या शुभम कुपटगिरी(कुपटेकर) (22) या तरुणाचा 48 तासांनंतर मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपासून शोध सुरू असलेल्या शुभमचा मृतदेह सोमवारी दुपारी 3.30 वाजता पाण्याच्या प्रवाहावर तरंगताना आढळला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

काय घडले?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शुक्रवारी दुपारी 12 वाजता शुभम आपल्या कुटुंबियांसोबत गणेश विसर्जन करत असताना नदीत बुडाला होता. शुभम उत्तम पोहणारा असूनही पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो वाहून गेला, असे म्हटले जात आहे.
शोधकार्य
घटनेची माहिती मिळताच खानापूर आणि नंदगड पोलिसांनी बचाव पथकासह तात्काळ शोधकार्य सुरू केले. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शोधमोहीम चालवण्यात आली, मात्र शुभमचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर, सोमवारी सकाळपासून गावातील तरुण आणि पोलिसांच्या मदतीने यडोगा बंधाऱ्याजवळ मृतदेहाची वाट पाहिली जात होती.
एका दगडाजवळ आढळला मृतदेह
शुभम ज्या ठिकाणी बुडाला होता, त्याच ठिकाणापासून काही अंतरावर एका दगडाजवळ त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. शुभमचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आणि यडोगा गावावर शोककळा पसरली आहे.