रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
खानापूर : येथील लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात नुकताच पियूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात नवख्या विद्यार्थ्यांचे भरघोस स्वागत करत शिक्षणाचा आणि विचारांचा दीप प्रज्वलित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. पंढरी परब हे होते. दीपप्रज्वलनाचा मान सोसायटीचे संचालक डॉ. दामोदर वागळे, सचिव श्री. किरण गावडे, प्राचार्या शरयू कदम, व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. केरूर, तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक आणि स्वागत भाषण प्राचार्या शरयू कदम यांनी केले. यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. दामोदर वागळे म्हणाले, “अकरावी आणि बारावीचा काळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर मेहनतीने आणि चिकाटीने ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने संधीचं सोनं केलं पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात श्री. पंढरी परब यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “यशस्वी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी चांगल्या विचारांची कास धरली पाहिजे, व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. उत्तम आरोग्य, नियोजन आणि प्रामाणिकपणा हे यशाचे मूलमंत्र आहेत.”
या कार्यक्रमात नूतन जिमखाना कमिटीचे उद्घाटन करण्यात आले तसेच विद्यार्थी प्रतिनिधींना शपथ दिली गेली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शंकर गावडा, प्रा. संदीप पाटील, प्रा. गुंडू कोडला, आर. एस. पाटील, पी. पी. पाटील, सोनी गुंजीकर, इमिलिया फर्नांडिस, डी. व्ही. पाटील, देवेंद्र घाडी आणि शिवाजी बेतगावडा यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रसिका गावडा हिने तर आभार प्रदर्शन कु. सानिका तिनेकर हिने केले.