रामगुरवाडी येथे श्री सातेरी माऊली व हुडगम्मा देवीच्या यात्रेची जय्यत तयारी

खानापूर: शहरापासून जवळच असलेल्या रामगुरवाडी येथे श्री सातेरी माऊली व ग्रामदेवता श्री हुडगम्मा देवीचा यात्रोत्सव तब्बल 21 वर्षांनंतर उत्साहात साजरा होणार आहे. हा उत्सव मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 पासून बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी या यात्रोत्सवाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली असून यात्रेपूर्वीचे धार्मिक विधी व परंपरा पुनरुज्जीवित करण्यात आल्या आहेत.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी मंदिरासमोर धार्मिक विधी होणार आहेत. बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत श्री सातेरी माऊली मंदिराजवळ सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी हुडगम्मा देवी यात्रेला सुरुवात होणार आहे.
शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी हुडगम्मा देवी मंदिराजवळ दुपारी 12 ते 3 या वेळेत सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता मरेवा देवी गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मनोरंजनाचे कार्यक्रम
- बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता ‘सैतानी पास’ या नाटकाचे आयोजन
- शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता ‘रामराज्य’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन
- शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता दौंड तालुक्यातील कांजळगावच्या हभप सोनालीताई फडके यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन
- रविवार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता उज्वल हिट्स कोल्हापूर यांचा आर्केस्ट्रा
- सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा

बक्षीस वितरण
या रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी खुल्या गटात अनुक्रमे ₹33,000, ₹15,000 व ₹7,000 तर 12 वर्षांपुढील गटासाठी अनुक्रमे ₹13,000, ₹15,000 व ₹7,000 आणि 12 वर्षांखालील गटासाठी अनुक्रमे ₹11,000, ₹7,000 व ₹3,000 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुकांनी 8 फेब्रुवारीपूर्वी नावे नोंदवावीत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ग्रामस्थांनी या यात्रोत्सवाला सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून देवीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
