पडलवाडी येथे भव्य हनुमान मंदिर उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा
पडलवाडी (ता. खानापूर) येथे नूतन हनुमान मंदिराचे कळसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळा दिनांक 13 व 14 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. मंदिर बांधकाम समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे 13 मे रोजी सकाळी 9 ते 1 दरम्यान हनुमान मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 6 या वेळेत मूर्ती शुद्धीकरण, शांती विधी व होम-हवण होतील. सायंकाळी 6 ते 8 वाजता भजनी कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 9 ते 12 दरम्यान ह.भ.प. गुरुवर्य श्री मारुती नागेंद्र सांबरेकर महाराज यांचे किर्तन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी, 14 मे रोजी सकाळी 10 वाजता वास्तूप्रवेश व कळसारोहण सोहळा पार पडेल. दुपारी 12.15 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा, महापूजा व आरती होणार असून, त्यानंतर 12.30 वाजता मंदिराचे औपचारिक उद्घाटन होईल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 ते 6 दरम्यान मान्यवर आणि देणगीदारांचा सत्कार तसेच माहेरवाशिणींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 ते 8.30 दरम्यान सौ. कल्पना गाडगीळ यांचे प्रवचन होईल आणि रात्री 9.30 वाजता चव्हाटा भजनी मंडळ, हेब्बाळहट्टी यांच्या भजनी-भारुड कार्यक्रमाने समारोप होईल.
या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास सर्व भाविक, ग्रामस्थ व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समिती व ग्रामस्थ पडलवाडी यांनी केले आहे.