ओलमणी शाळेतील दोन शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव
खानापूर: तालुक्यातील हायर प्रायमरी मराठी शाळा, ओलमणी येथील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. गुरव (रा. शिवाजीनगर, रामगुरवाडी) यांना श्री दत्त देवस्थान क्षेत्र, आडी-निपाणी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तर शाळेचे सहशिक्षक एस. टी. मेलगे (रा. गर्लगुंजी) यांना शिक्षण विभागाकडून दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.
शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षण विभाग आणि श्री दत्त देवस्थान समितीने या दोन्ही शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव केला.
मुख्याध्यापक गुरव सर व मेलगे सर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ओलमणीसारखे दुर्गम गाव आज खानापूर तालुक्यात नावलौकिकास आले आहे. शाळेचा कायापालट करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत व शैक्षणिक वातावरणात मोठी भर घातली आहे.
एकाच शाळेतील दोन शिक्षकांना असा सन्मान मिळाल्याने गावकरी, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीत उत्साहाचे वातावरण आहे. या कामगिरीमुळे ओलमणी शाळेचा गौरव वाढला असून सर्व स्तरातून या दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.

