नंदगड येथे लक्ष्मी यात्रेदरम्यान दारू विक्रीवर बंदी
खानापूर: नंदगड येथे तब्बल 25 वर्षांनंतर 12 ते 23 फेब्रुवारी दरम्यान श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेत अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नुकताच नंदगड गाव आणि परिसरात मद्य विक्री बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 11 फेब्रुवारी रात्री 8 वाजल्यापासून ते 24 फेब्रुवारी पहाटे 6 वाजेपर्यंत गावातील सर्व मद्य दुकानं व बार बंद राहणार आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी संभाव्य गर्दी आणि सुव्यवस्थेचा विचार करून मद्यबंदीची शिफारस केली होती. सामाजिक शांतता आणि सलोख्याचे वातावरण राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लक्ष्मी यात्रोत्सवाला 25 वर्षांनंतर होत असल्यामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात्रेच्या आयोजनासाठी प्रशासन सज्ज झाले असून, भाविकांनी शांततेत यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

