वाघ, बिबट्याच्या दहशतीत नेरसे परिसर; शेतकरी आणि नागरिक भीतीच्या छायेखाली ನೆರಸೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಾಡುಪ್ರಾಣಿಗಳ ಭೀತಿ: ಜೀವ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಬದುಕುತ್ತಿರುವ ರೈತ ಸಮುದಾಯ
खानापूर: तालुक्यातील नेरसे (नेरसा) आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जंगली प्राण्यांच्या वाढलेल्या त्रासामुळे शेतकरी आणि नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. भीमगड अभयारण्य परिसरात वाघ, बिबट्या, गवे, अस्वल आणि रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांची संख्या वाढल्यामुळे शेतीत मोठे नुकसान होत आहे. पिके फस्त केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर हिंस्त्र प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
या त्रासाचे ताजे उदाहरण म्हणजे मागील आठवड्यात नेरसा गवळीवाडा येथील सखाराम जानकर यांच्या गायीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. मात्र, वनखात्याच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वनखात्याकडून अभयारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवर नाहक गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात वाघांची संख्या वाढल्याचे अहवाल असूनही संरक्षणाचे कोणतेही नियोजन वनखात्याकडून करण्यात आलेले नाही.
या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनखात्याने त्वरित वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा पंधरा दिवसांत खानापूर येथे उग्र आंदोलन (मोर्चा काढून धरणे) करण्याचा इशारा नेरसावासियांनी दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या भागातील नागरिकांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.