खानापूर: कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

खानापूर: तालुक्यातील नेरसा येथील 43 वर्षीय शेतकरी नीलेश हैबतराव देसाई यांनी कर्जाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
नीलेश देसाई यांनी शेतीसाठी खानापूर येथील एका बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खराब हवामान आणि जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे त्यांचे शेतीत उत्पन्न घटले. त्यामुळे कर्जाचा भार वाढत गेला आणि ते मानसिक तणावाखाली आले.
गुरुवारी रात्री ते शेतात गेले, मात्र घरी परतले नाहीत. सकाळी कामगार शेतात गेले असता, झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. याची माहिती कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी खानापूर पोलिसांना दिली.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सी. एल. बबली यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, खानापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. नीलेश देसाई यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
ही घटना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
