अमृत शेलार पुन्हा अध्यक्षपदी! उपाध्यक्षपदी मेघशाम घाडी यांची बिनविरोध निवड
खानापूर येथे को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी सहकार पॅनलला बहुमताने निवडून देत बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला कौल दिला. गुरुवारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक देखील बिनविरोध पार पडली.
यामध्ये अध्यक्षपदी श्री. अमृत महादेव शेलार यांची आणि उपाध्यक्षपदी संचालक मेघशाम ज्योतिबा घाडी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक परशराम गुरव, डॉ. चंद्रकांत पाटील, श्री. रमेश नार्वेकर, श्री. विठ्ठल गुरव, श्री. विजय देवप्पा गुरव, श्री. मारुती पाटील, संचालिका अंजली कोडोली, अंजुबाई गुरव, श्री. मारुती बिलावर, श्री. अनिल बुरुड आदी उपस्थित होते.
संस्थेच्या प्रगतीसाठी अमृत शेलार यांचे योगदान महत्त्वाचे
खानापूर को-ऑप बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. विद्यमान अध्यक्ष अमृत शेलार यांनी संस्थेचे व्यवस्थापन अत्यंत कुशलतेने हाताळले असून, गेल्या तीन-चार वर्षांत बँकेला भरभराटीच्या दिशेने नेले आहे. संस्थेच्या आधुनिकीकरणावर भर देत त्यांनी कारभार पारदर्शक ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांना मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि निवडणुकीत त्यांना एकतर्फी विजय मिळवून दिला.
100 कोटींच्या ठेवींचा टप्पा लवकरच गाठणार – अमृत शेलार
अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर अमृत शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “खानापूर को-ऑप बँकेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता बँकेच्या ठेवी 100 कोटींच्या वर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आधुनिकीकरणाच्या माध्यमातून बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि भविष्यातही हे प्रयत्न सुरू राहतील. भागधारकांनी आमच्या सहकार पॅनलवर दाखवलेला विश्वास आम्ही कायम ठेवू.”
या निवडीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांसह उपस्थित बँकेच्या कर्मचारी वर्गाने तसेच अनेक ज्येष्ठ भागधारकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.
