खानापूर-बेळगांव महामार्गावर माकडाचा अपघात; प्राणिमित्रांच्या संवेदनशीलतेला सलाम
खानापूर-बेळगाव महामार्गावरील काटगाळी क्रॉसजवळ एका माकडाचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्राणीप्रेमींनी तातडीने मदतीचा हात पुढे करत माकडाला वाचवले आणि प्राण्यांसाठी रुग्णवाहिकेला कॉल केला.
रुग्णवाहिका येण्याआधीच खानापूर येथील एका डॉक्टरांनी तातडीने पुढाकार घेत माकडाला प्राथमिक उपचार दिले. विशेष म्हणजे, आवश्यक औषध उपलब्ध नसल्याने ते गणेबैल येथे जाऊन इंजेक्शन घेऊन आले आणि माकडाला ते देऊन त्याची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर जखमी माकडाला पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले.
प्राणिमित्रांच्या प्रयत्नांना यश; माकडाला नवजीवन
हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक माकड गेल्या चार दिवसांपासून निपचित पडले होते. प्राणिमित्रांनी तातडीने मदत करून त्याला जीवदान दिले आणि यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले.
सध्या या माकडाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्याच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत. लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती प्राणिमित्रांकडून देण्यात आली आहे. या संवेदनशील मदतीबद्दल आणि प्राणिमित्रांच्या प्रयत्नांबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
प्राण्यांना मदत करा, संवेदनशीलतेने वागा
या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, संकटात सापडलेल्या प्राण्यांना मदतीची नितांत गरज असते. आपण सर्वांनी अशीच मदतीची भावना जोपासावी आणि गरजू प्राण्यांसाठी नेहमी तत्पर राहावे.
