तिओली येथील विद्यार्थ्यांनी शाळेत केले आईवडिलांचे पूजन; केला शिक्षकांचा मान सन्मान
शिक्षकांचे योगदान आणि मातृ-पितृ पूजनाने शाळेत साजरा झाला विशेष दिवस
खानापूर: सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, तिओली येथे दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी मातृ-पितृ पूजन व्याख्यानमाला आणि दुपारच्या सत्रात बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर सरकारी प्रौढ शाळा मच्छेचे शिक्षक श्री. चंद्रकांत जैनापुरे यांनी “बदलत्या काळात मुलांवर होणारे संस्कार” या विषयावर व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात तिओली शाळेतून बदली झालेल्या ए.आर पाटील, हिरेमठ तसेच देसाई या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिओली शाळेचे SDMC अध्यक्ष श्री. यल्लाप्पा प्रल्हाद लाटगांवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष पाटील, यशवंत देसाई, सहदेव हेब्बाळकर, यल्लाप्पा पाटील, दीपक हेब्बाळकर, नागराज लोकोळकर, स्वाती पाटील, सारिका घाडी आणि स्नेहा हेब्बाळकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. बी. गावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी आरती पाटील हिने केले. आभार प्रदर्शन तिओली शाळेचे सहशिक्षक श्री. मारुती कुट्रे यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेच्या सहशिक्षिका सौ. एल. पी. पाटील व कु. एस. आर. रजपुत्र मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.