शिरोली-नेरसा भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिरोली: आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील अबनाळी, डोंगरगाव, गवाळी, हेम्मडगा, जामगाव, नेरसे, पाली, शिरोली, तिवोली, चापवाडा, हणबरवाडा, कोंगळे, मेंडील, पास्तोली, सायाचीमाल, शिरोलिवाडा, तेरेगाळी आदी गावातील शाळांमधील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले गेले.
युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी दुर्गम भागात सेवा बजावत मराठी शाळांची काळजी घेणाऱ्या शिक्षकांचे यावेळी कौतुक केले तसेच मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी युवा समितीच्या उपक्रमाला सदिच्छा देत मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून पालकांनी माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी यासाठी जनजागृती करत पुढे आले पाहिजे असे सांगितले.
यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, आकाश भेकणे यांच्यासह सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, सहशिक्षक उपस्थित होते.