रस्ता नाही, मृत्यूचं आमंत्रण! लोंढा फाट्याजवळील महामार्गाची दयनीय स्थिती
खानापूर: बेळगाव-पणजी महामार्गावरील लोंढा फाट्याजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता पूर्णतः ओळखू न येण्यासारखा झाला असून, हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.

दररोज या मार्गाने प्रवास करणारे वाहनचालक तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रस्ता चिखलाने भरलेला असून, अपघात होण्याची शक्यता सतत निर्माण होत आहे. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

खड्ड्यांमध्ये वाहने अडकून अनेकदा अपघात घडत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महामार्ग प्राधिकरणाकडूनही कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे वाहनचालक संभ्रमित होत आहेत.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.