लोकोळी येथे आत्महत्या: कृषी पत्तीनचे सचिव प्रकाश पाटील यांनी संपवले जीवन
खानापूर तालुक्यातील लक्केबैल कृषी पतीन सहकारी संघाचे सचिव, प्रकाश पांडुरंग पाटील (वय 47, रा. लोकोळी, ता. खानापूर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. प्रकाश पाटील हे गेल्या 22 वर्षांपासून या संघात सचिव म्हणून कार्यरत होते.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास, त्यांनी आपल्या दुसऱ्या सहकार्याला घरी जेवणासाठी पाठवले. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या कार्यालयात कीटकनाशक औषध प्राशन केले. ही घटना दुपारी उघडकीस आली आणि यामुळे स्थानिक समुदायात शोककळा पसरली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
प्रकाश पाटील हे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सचिव म्हणून ओळखले जात होते आणि संस्थेच्या प्रगतीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. संस्थेच्या व्यवहारातील तक्रारी व मागील वर्षी झालेल्या नव्या कमिटीमुळे वाढलेल्या अंतर्गत वादांमुळे त्यांच्यावर ताण होता. या सोबतच, काही कौटुंबिक अडचणी देखील त्यांच्या जीवनात होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला.
प्रकाश पाटील यांनी आपली व्यथा कोणालाही बोलून न दाखवता सोसायटीच्या कार्यालयात आत्महत्या केली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. खानापूर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे लोकोळी-लक्केबैल परिसर आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.