लोकोळी ग्रामपंचायतीत सेवानिवृत्त सत्कार समारंभ
खानापूर: लोकोळी-जैनकोप येथे ग्रामपंचायतीत वॉटरमन पदावर कार्यरत असलेले श्री. नारायण शिवाजी पाटील हे आपल्या दीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात एक भावनिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या समारंभाला ग्रामपंचायतचे पी. डी. ओ. , अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉटरमन श्री. नारायण पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

श्री. नारायण पाटील हे अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून परिचित होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी कोणतीही तक्रार न येऊ देता सातत्याने व समर्पित भावनेने सेवा बजावली. त्यामुळे त्यांना ग्रामस्थांचा मनःपूर्वक सन्मान लाभला.
त्यांच्या पुढील जीवनासाठी सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत ग्रामस्थांनी त्यांच्या सेवेला अभिवादन केले.