नंदिहळ्ळी–गर्लगुंजी परिसरात बिबट्यासदृश प्राण्याचा संशयास्पद वावरआठ दिवसांपासून दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खानापूर: नंदिहळ्ळी, गर्लगुंजी आणि राजहंसगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यासदृश प्राण्याचा वावर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मागील आठ दिवसांत या भागातील नागरिकांना अधूनमधून या प्राण्याचे दर्शन झाल्याचा दावा करण्यात येत असून, गुरुवारी (दि. ११) रात्री एकाचवेळी ३५ हून अधिक जणांनी असा अनुभव आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनखात्याने तातडीने दखल घेत संबंधित भागात पाहणी केली. नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री उघड्यावर फिरणे टाळावे तसेच जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनखात्याने केले आहे. नंदिहळ्ळी व गर्लगुंजी परिसरात राखीव जंगल, दाट झाडी आणि माळरान मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यप्राण्यांचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, बेळगावहून घरी परतत असताना एका नागरिकाला बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. त्याने चित्रीकरण केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती अधिक वाढली. या घटनेची माहिती ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी खानापूर वनखात्याला दिली. त्यानंतर वनखात्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत प्राण्याच्या पावलांच्या ठशांचे नमुने संकलित केले आहेत.
सध्या हा प्राणी नेमका बिबट्या आहे की तरस, याबाबत वनखाते निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. सन २०१६ मध्ये याच परिसरात तरसाचा वावर आढळून आला होता. त्यामुळे सध्याच्या ठशांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच प्राण्याची ओळख स्पष्ट होणार आहे.
पोल्ट्री फार्ममुळे वाढलेला कुत्र्यांचा वावर
कणवीच्या वरच्या भागात सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. पोल्ट्रीमधील टाकाऊ पदार्थांमुळे कुत्रे मोठ्या प्रमाणात या परिसरात जमा होतात. कुत्रे हे बिबट्याचे आवडते खाद्य असल्याने, त्यांच्या शोधात हा प्राणी या भागात येत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिस्थितीचा आढावा घेत ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील आणि भरत गोरे यांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती दिली. सध्या वनखात्याने चार कर्मचारी या परिसरात तैनात केले असून, दिवसा व रात्री नियमित गस्त घालून हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि संशयास्पद बाबी तात्काळ वनखात्याच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
